येथील उपविभागीय पोलिस अधिकारी शशीकिरण काशिद व प्रभारी पोलिस निरीक्षक सुजित गडदे यांना उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते गौरवण्यात आले. रत्नागिरीतील पोलिस मुख्यालय येथील कार्यक्रमाला अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड उपस्थित होत्या. रत्नागिरी जिल्हा पोलिसदलातर्फे मासिक गुन्हे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील पोलिस विभागातील विविध गुन्ह्यांमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या पोलिस अधिकारी व अंमलदारांना पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. खेडचे उपविभागीय अधिकारी शशीकिरण काशिद, चिपळूणचे उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन बारी, खेडचे प्रभारी पोलिस निरीक्षक सुजित गडदे, सावर्डेचे पोलिस निरीक्षक भरत धुमाळ आदींना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.