मालेगावी ग्रामस्थांचे धरणे वडनेर खाकुर्डीतील रामनगर रस्त्याचे काम सुरू करण्याची मागणी


अनिकेत मशिदकर मालेगाव प्रतिनिधी 

      तालुक्यातील वडनेर खाकुर्डी येथील रामनगर रस्त्याचे बंद पडलेले काम त्वरित सुरू करण्यात यावे, या मागणीसाठी गावकऱ्यांच्या वतीने अपर जिल्हाधिकारी कार्यालय येथे धरणे आंदोलन करण्यात येऊन निवेदन सादर करण्यात आले. याबाबत पालकमंत्री दादाज भुसे यांनाही यापूर्वी निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, वडनेर येथील सातमाने वडनेर रस्त्याच्या पश्चिमेस अनेक वर्षांपासून परिसरातील शेतकऱ्यांनी रामनगर म्हणून नियमानुसार रहिवासी वसाहत वस्ती उभारली आहे. 

      रामनगर वस्तीत सुमारे १०० ते १२५ निवासी घरे आहेत. सुमारे दोन हजार लोकसंख्या आहे. रामनगर वस्तीत गेल्या अनेक वर्षांपासून जि. प. मराठी शाळा, अंगणवाडी, ग्रा. पं. मार्फत पिण्याच्या पाण्याची टाकी आदी सोईसुविधा नियमाप्रमाणे उपलब्ध करून देण्यात आल्या. रामनगर येथील रहिवाशांचा वडनेर गावाशी संपर्क आहे. वडनेर गावात जीवनावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी तेथे जावे यावे लागते. वस्तीवर जाण्यासाठी सातमाने वडनेर रस्त्यापासून पश्चिम दिशेस पूर्वापार वापराच्या रस्त्याचा रामनगर येथील रहिवासी वापर करीत असतात. रस्त्याचे काम सुरू करण्यात आले होते. काम अर्धवट स्वरूपाचे झालेले आहे. रस्त्याचे काम अनेक दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे आम्हाला मोठ्या कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. हा रस्ता दुरूस्तीसाठी अनेकवेळा मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. निवेदनावर रघुनाथ वाघ, मुरलीधर बागुल, साहेबराव अहिरे, संतोष अहिरे, रमेश जाधव आदींच्या सह्या आहेत. 

                                                             रामनगर वस्तीत रहिवाशांना त्रास

          मागील वर्षी अतिवृष्टीमुळे सदर रस्ता संपूर्ण खोदला गेला. हा रस्ता हा मृत्यूचा सापळा झाला आहे. रस्त्यावर अनेक अपघात होऊन बरेच जण जखमी झाले आहेत. रामनगर येथील रहिवाशांना आपल्या वस्तीपासून, घरातून बाहेर निघून गावापावेतो वा सार्वजनिक वहिवाट रस्त्यावर येईपावेतो अशक्य झालेले आहे. हा रस्ता ग्रामसडक योजनेंतर्गत, मुख्यमंत्री सहायता योजनेत पक्क्या रस्त्यात रूपांतरित करण्यासाठी शासकीय स्तरावर संपूर्ण कार्यवाही पूर्ण करण्यात येऊन वहिवाट मंजूर करण्यात आलेली होती. संबंधित सर्व शासकीय अधिकारी वहिवाट रस्त्यावर येऊन पाहणीही काम करून गेले.